औरंगाबाद – मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत. मध्यंतरी जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक झाल्या परंतु त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूका पुन्हा लांबणीवर पडल्या. जर आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही तर मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत या सर्व निवडणूका फेब्रुवारी महिन्यात होतील असे मोठे विधान राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनी केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यावर ते बोलत होते. एकंदरीतच सत्तारांच्या या वक्तव्यामुळे आता शहरात पुन्हा एकदा राजकारण तापणार आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे, लोकांची काळजी करणारे हे सरकार आहे. आम्हाला आदेश आल्यावर मी स्वतः चार जिल्ह्यात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर झालेल्या सर्व नुकसानीची माहिती सरकारला मिळाली आहे तसेच अजूनही बहुतांश पंचनामे बाकी आहेत. सर पंचनामे आले कि कॅबिनेट बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल असेही सत्तार यांनी सांगितले.
शिवसेना निवडणुकीसाठी तयार – अब्दुल सतार
कोरोनाचा प्रादुर्भाव न वाढल्यास आगामी फेब्रुवारी महिन्यात सर्व मनपा, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगर पंचायत निवडणूक होतील तसेच या निवडणुकीला शिवसेना पूर्ण तयार आहे. तसेच उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार आम्ही निवडणूक लढणार आहोत. त्यांनी सांगितले महाविकास आघाडी तर महाविकास आघाडी आणि जर त्यांनी सांगितले एकला चलो तर एकला चलो सूची आमची तयारी आहे असे देखील राज्यमंत्री सत्तार यांनी यावेळी बोलताना सांगितले.