घरासमोर झोपलेल्या तरूणाचा गळा चिरून खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील पोलीस स्टेशन हद्दीतील पाडेगाव येथील शिवंचा मळा येथे घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर खळबळ उडाली असून लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाडेगाव गावठाण पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवंचा मळा येथील राहुल नारायण मोहिते (वय 31) हा तरूण आपल्या घरासमोर झोपलेला होता. झेपेमध्येच त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केला. तसेच गळा कापून त्‍याचा निर्घृण खून केला. यामध्ये राहुल याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने मोठा घाव घातल्याने जखम खोलवर गेल्याने मोठ्या प्रमाणावर रक्‍त स्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घरातील लोक सकाळी बाहेर आले असता त्यांना राहुल अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत अंधारून आला.

त्यानंतर लोकांनी या घटनेची तत्काळ माहिती लोणंद पोलिसांना दिली. खुनाची माहिती मिळताच घटनास्थळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना रक्‍ताच्या थारोळ्यात राहुलचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून राहुल याचा खून नेमका कोणत्या कारणासाठी केला असावा याचा तपास लोणंद पोलीस करत आहेत.

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी भेट दिली असून पुढील तपासासाठी तपासी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. राहुल मोहिते हा तरूण ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. त्याचे लग्न झाले नव्हते. त्याच्या कुंटुबात आई, वडील, भाऊ, भावजय असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment