कोल्लम : वृत्तसंस्था – दृश्यम चित्रपट सगळ्यांनी पहिलाच असेल. त्यामधील नायक हत्या करून मृतदेह दफन करतो आणि कोणाला समजतदेखील नाही. अशीच काहीशी घटना केरळच्या कोल्लममध्ये घडली आहे. या घटनेत आरोपीने आपल्या आई आणि पत्नीच्या मदतीनं एका नातेवाईकाची हत्या करून त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागे दफन केला. महत्वाचे म्हणजे हि घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती. कुटुंबाने हे रहस्य पूर्णपणे लपवून ठेवले होते. एका व्यक्तीला या घटनेचा संशय आला त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
काय आहे नेमकं प्रकरण
शाजी पीटर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शाजी पीटर हा आपल्या घरच्यांपासून लांब राहत होता. २०१८ मध्ये शाजी घरी परतला तेव्हा त्याचे आणि त्याच्या घरच्यांसोबतचे संबंध खराब झाले. तसेच शाजीने त्याच्या छोट्या भाऊ साजिदच्या पत्नीसोबत वाईट वर्तवणूक केली होती. याचा राग मनात धरून साजिदने स्वत:च्या भावाची हत्या केली. हत्या केल्यानंतर आई आणि पत्नीच्या मदतीने त्याने शाजीचा मृतदेह घराच्या पाठीमागे दफन केला होता. हि घटना बॉलिवूड सिनेमा दृश्यम चित्रपटासारखी वाटत आहे. यामध्ये पण नायक लोकांना अशाच प्रकारे फसवत असे.
अडीच वर्षानंतर हत्येचे गुढ उलघडले
साजिद पीटर आणि त्याच्या घरच्यांनी हा गुन्हा अडीच वर्षे लपवून ठेवला होता. जर कोणी शाजी पीटरबद्दल विचारले असता शाजी केरळच्या मल्लापूरममध्ये काम करत असल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात येत होते. हा कारनामा जवळजवळ अडीच वर्षे चालू होता. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी साजिद पीटर, त्याची आई आणि पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या मदतीने शाजी पीटरचा मृतदेह बाहेर काढून तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये साजिदने पूर्ण प्लॅनींग करून हि हत्या केली आणि आपल्या घराच्या मागे दफन केले. तसेच मृतदेहाचा वास येऊ नये यासाठी त्याच्या शरीराला कपड्यांनी गुंडाळले होते.