सांगली : जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत मित्राने दिलेले उसने पैसे परत मागितल्याचा रागातून खून केल्याची घटना घडली होती. या खूनप्रकरणी कर्नाटक राज्यातल्या कनमडी येथील आरोपी शिवानंद भीमाण्णा मुजनवार यास दोषी धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महादेव कोहळी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मयत महादेव कोहळी व आरोपी शिवानंद मुजनवार हे दोघे मित्र होते. मयत महादेव कोहळी यांनी सुमारे तीन ते चार लाख रुपये आरोपी शिवानंद मुजनवार याला हातउसने दिले होते. सदरची रक्कम परत मागितल्याचा कारणातून बर्याच वेळा मयत व आरोपी यांच्यामध्ये वादावादी झाली होती. त्यानंतर आरोपी याने त्याच्या जमिनीचा व्यवहार झाल्यावर पैसे देण्याचे कबूल केले होते. जेवण झाल्यानंतर दुसर्या दिवशी विजापूर कोर्टात एकत्र जाण्याबाबत दोघांमध्ये बोलणे झाले.
त्यानुसार दुसर्या दिवशी दिनांक 12 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी नऊ वाजता कोहळी यांनी मुजनवारला फोन केला व बिजरगी स्टॅन्डवर येत आहे तू मोटारसायकल घेऊन ये असे त्यांच्यात बोलणे झाले. रात्री उशिरापर्यंत मुलीने त्यांची वाट पाहिली परंतु कोहळी हे घरी आले नाहीत. ते विजापूर येथील पाहुण्यांकडे थांबले असतील असे समजून त्यांना फोन केला नाही.
13 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी एक वाजता कोहळी यांच्या नातेवाईकांचा त्यांच्या मुलीला फोन आला व त्यांनी सांगितले की, मोटेवाडी गावच्या हद्दीत फॉरेस्टमध्ये कोहळी यांचा खून झालेला असून त्यांचे प्रेत तिथे पडले आहे. त्यानंतर सदरचे प्रेत हे शवविच्छेदनासाठी जत येथे आणण्यात आले. त्यावेळी मयताची मुलगी कलावती हिने शिवानंद मुजानवार याने माझ्या वडिलांचा पैशासाठी खून केला आहे अशी तक्रार पोलिसात दिली.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. एम. सपांगे यांनी तपास केला व आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सरकारपक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व पुरावा न्यायालयात दाखल झाल्यानंतर आरोपीला दोषी धरण्यात आले व त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.