सांगली | आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथे चुलत दीरासोबत असलेले अनैतिक संबंध उघडकीस येवू नये म्हणून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या घटनेत मारुती कोंडिबा तळे (वय- 32) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी माया मारुती तळे (वय- 25) आणि तिचा चुलत दीर आकाश तुकाराम तळे (वय- 24, दोघेही रा. मासाळवाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माया तळे या विवाहितेचे चुलत दीर आकाश तळे याच्याशी अनैतिक संबंध होते. या कारणावरून 30 जून रोजी मध्यरात्री पती- पत्नीत भांडण झाले. यावेळी महिलेचा प्रियकर असलेला चुलत दीर आकाश तळे तिथे गेला होता. तेव्हा मारुती तळे व आकाश या दोघांमध्ये झटापट झाली. त्यामुळे मायाने पती मारुतीच्या डोक्यात कोणत्या तरी टणक वस्तूने मारहाण केली. मारहाणीत मारुती गंभीर जखमी झाला. त्यानंतर माया आणि आकाश या दोघांनी संगनमताने मारूतीस घराजवळच्या रस्त्यालगतच्या विहिरीत फेकून दिले. आपला संशय येऊ नये म्हणून दोघांनी मयत मारुतीची स्कुटी मोटरसायकल विहिरीत फेकून अपघाताचा बनाव केला. दुसरे दिवशी मृतदेह विहिरीतून काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत मयताचा भाऊ दादासो कोंडीबा तळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार जगन्नाथ पुकळे व सहकार्यांनी तपास केला असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.
पतीच्या खूनप्रकरणी पोलिसांनी संशयित पत्नी मायाला माहेरातून (अनूसेवाडी ता. आटपाडी) ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आकाश तळेला पण ताब्यात घेतले. अधिक तपास सपोनि सुधीर पाटील करत आहेत.