औरंगाबादक – आठ दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या कामगाराचा मृतदेह खदानीत लटकत्या अवस्थेत आढळला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष विठ्ठल वाघमारे (३२) राहणार वाळूज असे मयताचे नाव आहे. गुरुवारी एका खदानीतील झाडाला लटकत्या अवस्थेत सापडल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातील तिसगावच्या खदानीतील झाडाला या कामगाराचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. मात्र या कामगाराच्या नातेवाईकांनी यामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वाळूज परिसरातील वडगाव येथून आठ दिवसांपूर्वी संतोष विठ्ठल वाघमारे हा कामगार बेपत्ता झाला होता. ३२ वर्षीय संतोष हा वाळूज एमआयडीसीतील लुमॅक्स कंपनीत काम करत होता. ९ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास मी कंपनीत कामाला जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला होता. मात्र संध्याकाळपर्यंत तो घरी परतलाच नाही. अखेर खूप शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्नीने एमआयडीसी वाळू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान परिसरातील खवड्या डोंगरालगतल्या एका खदानीतील झाडाला एक मृतदेह लटकत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. ही माहिती गावकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना दिली. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पोलिसांना हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यानंतर हा संतोषचाच मृतदेह असल्याचा शोध लागला. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवून घेतले. कपड्यांवरून त्याची ओळख पटली. नातेवाईकांच्या मदतीने संतोष वाघमारे याचा कुजलेला मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुखदेव भागडे करीत आहेत.