सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगलीतील १०० फुटी रोडवरील पाकिजा मशिदीमागे झालेल्या भाउजीच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने खुनातील मुख्य संशयित आरोपी अलीम पठाण व शाहरुख पठाण यांच्या कर्नाटकातील विजापूर येथून मुसक्या आवळल्या. अवघ्या २४ तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाला यश आलेलं आहे.
बुधवारी मध्यरात्री जमीर रफिक पठाण यांचा त्यांचे मेहुणे अलीम सलीम पठाण व शाहरुख सलीम पठाण यांनी जमीर यांच्या छातीत घरगुती वादातून चाकूने जोरदार वार करून खून केला होता. खुनानंतर दोघे जण पसार झाले होते. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी या खुनाचा तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे याना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पिंगळे यांनी एक पथक तयार केले होते. पोलीस उपनिरीक्षक शरद माळी हे त्यांच्या पथकातील कर्मचारी घेऊन घटनास्थळी गेले व त्यांनी माहिती घेतली असता संशयित हे कर्नाटकात त्यांच्या पाहुण्यांकडे गेल्याचे समजले.
त्यानुसार पथक संशयितांच्या शोधासाठी कर्नाटकात रवाना झाले. दोघे संशयित पथकाला विजापूर येथे आढळले. तेथून या दोघांना अटक करण्यात आली आहे. अलीम हा खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असल्याने त्याचा मुलगा त्याच्याकडे जात नव्हता. याचा अलिमला राग होता. त्यातूनच त्यांच्यात सतत वाद होत होते. असाच वाद बुधवारी रात्री त्याच्या दोघं मेहुण्यांच्यात झाला. यावर चिडलेल्या अलीम याने चाकूने जमीर यांच्या छातीत जोरदार वार केला. गंभीर जखमी झालेल्या जमीर याना दुचाकीवरून सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.