हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल हे रिंगणात उतरणार आहेत. शिंदे गट ही जागा लढणार नाही हे यामुळे स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आज आपला उमेदवारी अर्ज भरतील.
मुरजी पटेल नेमकं शिंदे गटाकडून निवडणूक लढवणार की भाजपकडून लढणार याकडे सर्वांचे लक्ष्य होत. अखेर काल रात्री भाजप आमदार आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पार पडलेल्या बैठकीनंतर मुरजी पटेल हे भाजपच्या कमळ या चिन्हांवर लढणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल असा सामना पाहायला मिळेल.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल यांनी दिवंगत रमेश लटके यांना कडवं आव्हान दिले होते. शिवसेना- भाजप युतीत ही जागा शिवसेनेकडे होती. त्यावेळी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर अपक्ष लढलेल्या मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती. मुरजी पटेल यांना तेव्हाही भाजपने अंतर्गत पाठिंबा दिला होता अशा चर्चा सुरु होत्या.