कोरोनाला रोखण्यासाठी मैदानात उतरणार ‘माझा डॉक्टर’; मुख्यमंत्र्यांचा 1 हजार फॅमिली डॉक्टरांशी संवाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या या महामारीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही केल्या ती कमी होत नसून ती कमी करण्यासाठी राज्य सरकारकडूनही सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक मार्गानी उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात येणारी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोणकोणत्या आरोग्याबाबतच्या उपाययोजना करता येऊ शकतील? याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील सुमारे ७०० डॉकटरांशी तर चार दिवसापूर्वी ३०० डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतील फॅमिली डॉक्टर्सनी ‘माझा डॉकटर’ बनून सर्वसामान्यांना योग्य उपाय सांगावेत, असे सूचित केले.

मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात आता कोरोनाची तिसरी लाटही येणार असल्याने ठाकरे सरकारने या लाटेशी चार हात करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यातील एक भाग म्हणजे आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी एका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टरांशी संवाद साधला. यात मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सनी एकाचवेळी सहभाग घेतला. यापूर्वीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी चार दिवसांपूर्वी तीनशे डॉक्टरांशी संवाद साधला होता. दरम्यान आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या चर्चेवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, कोरोनाच्या या महामारीच्या काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. आणि या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

वास्तविक पाहता घरातील लहान मुलास तसेच मोठ्या व्यक्तीस काही दुखापत झाल्यास कुटुंबातील इतर व्यक्ती सर्वप्रथम जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन जातात. त्यामुळे या कुटुंबातील फॅमिली डॉक्टरांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण “माझा डॉक्टर” बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होईल. तसेच इतर आजारासह कोरोनाच्याविषयीही त्यांची विचारपूस करीत उपचार केल्यास रुग्ण लवकर बरे होऊ शकतील. त्यामुळे आता कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेशी चारहात करण्यास फॅमिली डॉक्टरांनी “माझा डॉक्टर” बनून मैदानात उतरावे, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

Leave a Comment