औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सध्या राज्यात मागच्या दीड वर्षांपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात डोक्यावर कर्ज, आणि त्यात धंदा ठप्प झाल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणाने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्याने माझ्या पत्नीनं पार्थिवाला अग्नी द्यावा, अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण
मृत व्यक्तीचे नाव भीमराव कांबळे आहे. तो औरंगाबादमधील वेदांतनगर परिसरात आपल्या पत्नीसोबत राहत होता. तो ड्रायव्हरचे काम करत होता. त्याने लॉकडाऊनपूर्वी कर्ज काढून एक रिक्षा विकत घेतली होती.रिक्षा विकत घेतल्यानंतर काही दिवसांनी कोरोनाची साथ सुरू झाली आणि राज्यात लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे त्याचे काम ठप्प झाले. यामुळे त्याला कर्जाचे हफ्ते भरणे देखील अवघड झाले होते. यामुळे तो मागच्या काही काळापासून तणावाखाली जगत होता.
यानंतर गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास जेवन झाल्यानंतर भीमराव तासाभरात घरी येतो, असे सांगून घराबाहेर पडला तो खूप वेळ झाला तरी घरी परत आला नव्हता. खूप वेळ झाल्यानंतर भीमरावांच्या पत्नीने जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली पण भीमरावाचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास राजनगरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत भीमराव यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी मृतदेह फासावरून खाली उतरवून रुग्णालयात दाखल केला पण त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याच्याकडे एक चिठ्ठी सापडली त्यामध्ये त्याने आपण डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटलं आहे. तसेच आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये असे त्याने चिठ्ठीमध्ये लिहिले होते.