सांगली प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज पलूस तालुक्यातील ब्रह्मनळी गावाला भेट दिली आहे. या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. पूरग्रस्तांचे दुःख पाहून शर्मिला ठाकरे भावून झाल्या आणि त्यांच्या भावनेचा बांध फुटला आणि त्या रडू लागल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी बघून येथील गावकऱ्यांनी देखील आपल्या मनातील दुःखाला नव्याने वाट करून दिली आणि गावकरी देखील रडू लागले.
शर्मिला ठाकरे यांनी आज सांगली जिल्ह्यातील पूर बाधित गावांची भेट घेऊन येथील लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ब्रह्मनळी गावात जाऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्याच प्रमाणे त्यांनी मदत केंद्रात जाऊन नागरिकांशी संवाद देखील साधला. पूराच्या पाण्यात बोट उलटून ब्रह्मनळी गावातील १७ लोक मृत्युमुखी पडले होते.
दरम्यान आज नाना पाटेकर आणि उर्मिला मातोंडकर यांनी देखील पूरग्रस्त भागात जाऊन लोकांशी संवाद साधला आहे. त्याच -प्रमाणे नाना पाटेकर यांनी २००० घरे बांधून देण्याचा देखील निर्धार लोकांना बोलून दाखवला आहे. नाना पाटेकर लोकांना भेटताच लोकांनी नानांच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली. हे दृश्य एवढे भावुक होते की लोकांना नाना म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती वाटत होते आणि त्यांच्या गळयात पडून लोक आपल्या अश्रूंना वाट करून देत होते.