हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे वकील सतीश उके यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील पिटीशनमध्ये सतीश उके हे माझे वकील आहेत. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणातही माझे वकील आहेत. वकील आपली केस लढतात. याचा अर्थ सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा तयार केली जात आहे. हे भाजपचे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी पटोले म्हणाले की, राजकारणात राजकीय विरोध असू शकतो. आज मुंबईची ईडी नागपूरात येऊन कारवाई करत आहे. मात्र, कॉंग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार नाही. प्रत्येक कारवाईच्या मागे तपास यंत्रणांचा हात असतो. मात्र, कुणाच्या दबावाखाली येऊन कारवाई व्हायला लागली तर खूप अवघड आहे.
ब्लॅकमेलिंग करण्याचं काम जे भाजप करतंय, ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे जे पोलिस अधिकारी कारवाई करत आहेत, त्यांच्यावरती देखील करवाई व्हायला हवी. काँग्रेसमध्ये अनुसूचित जाती, जमातींचा सहभाग वाढायला लागला आहे. त्यामुळं अशा प्रकरणावर काँग्रेसला आणि नाना पटोलेंना बदनाम करण्याचं षडयंत्र या पद्धतीनं सुरू झालं आहे. माध्यमांमध्ये माझे वकील म्हणून टार्गेट केले जात आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.