हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. उद्या मुंबई गुजरातला गेली तरी त्यात काही नावीन्य राहणार नाही असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, औरंगाबादेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, मला मोदी शहांचे हस्तक व्हायला आवडेल, खरं तर त्यांनी महाराष्ट्राचे हस्तक व्हायला हवं. उपमुख्यमंत्री सध्या सत्तेच्या जोमात असून केंद्र सरकार सांगेल त्यापद्धतीने सगळं करत आहेत. २०१४ ला मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील आर्थिक व्यवस्था गुजरातला पाठवली. राज्यातील पाणी गुजरातला दिले. महारष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत असा आरोप नाना पटोले यांनी केला.
उद्या मुंबई गुजरातला गेली तरी त्यात काही नावीन्य राहणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, या सर्व गोष्टींचा आम्ही विरोध करतो. खरं तर लाखो तरुणांना वेदांता प्रकल्पातून रोजगार मिळणार होता, दीड लाख कोटींची गुंतवणूक राज्यात झाली असती त्यामुळे ही कंपनी पुन्हा महाराष्ट्रात यावी अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.