नांदेड प्रतिनिधी | तेलंगणा राष्ट्र समिती सरकारच्यावतीने तेलंगणा राज्यात राबवण्यात येणा-या कल्याणकारी योजनेला प्रभावित होत तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील गावांमधील सरपंचानी ग्रामस्थांसह मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान तेलंगणा राज्याप्रमाणे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सीमेलगत असलेल्या गावांमध्ये करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. त्याचबरोबर ही योजना लागू न केल्यास नांदेड जिल्ह्यातील गावांना तेलंगणा राज्यात समाविष्ट करुन घ्यावे, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. शिवाय या मागणीवरुन आगामी विधानसभा निवडणुक लक्षात घेऊन टीआरएसकडून निवडणूकांना सामोरे जाण्याची इच्छा या लोकप्रतिनिधींनी केसीआर यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यावर काय निर्णय घेतात याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नांदेड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ असलेले हे गावे तेलंगणाच्या सीमेलगत आहे. नागाव, भोकर, डेगलूर, किनवट आणि हाथगाव या गावाच्या विकासासाठी तेलंगणाप्रमाणे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लंक्ष केलं जात असून आता या मागणीसाठी त्यांनी सीमेलगत असलेल्या राज्याकडे धाव घेतली असल्याचं दिसत आहे. काल या पाच गावातील लोकप्रतिनिधींनी केसीआर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी तेलंगणा राज्यात राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांचे कौतूक केले. तसेच या मागणीसाठी आगामी निवडणूक लक्षात घेत यामध्ये टीआरएसकडून निवडणूक लढण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.