हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रभादेवी येथील शिवसेना आणि शिंदे गटातील राडा प्रकरणात आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आम्ही या धांगडधिंग्याची दखल घेत नाही, आम्ही जर दखल घेतली तर चालणं, बोलणं फिरणं कठीण होईल असा थेट इशारा त्यांनी शिवसेनेला दिला आहे.
नारायण राणे यांनी प्रभादेवीतील राड्यानंतर आज शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान राणेंनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेकडे आता तक्रार करण्यापलीकडे काहीही उरलेलं नाही. मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारींचं मार्केटिंग सुरू आहे. पण त्यांनी असे हल्ले वगेरे करू नये, मुंबई आणि महाराष्ट्रात त्यांनाही फिरायचं आहे. परवानगी घ्यावी लागेल याचा त्यांनीही विचार करावा असं नारायण म्हणाले.
सदा सरवणकर माझे मित्र आहेत आणि आम्ही आता युतीमध्ये आहेत म्हणून मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मुंबईत शिंदे गटाची ताकद काय आहे ते काळानुसार कळेल पण शिवसेनेची ताकद काय आहे ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलं आहे त्यामुळे ठाकरे गटाच्या या असल्या धांगडधिंगाण्याची दखल आम्ही घेत नाही. घेतली तर यांचं चालणं बोलणं कठीण होऊन बसेल. असा थेट इशारा नारायण राणेंनी शिवसेनेला दिला.