हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षण आणि मराठा बांधवाशी फोनवर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाबद्दल शिवराळ वक्तव्य केले होते. त्यावरून मराठा बांधव आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच अनुषंगाने आज पाटण येथील मराठा आरक्षणाच्या आंदोलनस्थळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोला चपलांचा हार घालून त्यांचा फोटो जाळून निषेध करण्यात आला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी करत आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या लढ्यास पाठींबा देण्यासाठी उत्पादन शुल्कचे मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण येथे समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, राजकीय दबाव झुगारुन तालुक्यातील सुमारे ३० गावांनी नेत्यांना गावबंदी करण्यासाठी एकी दाखवली आहे.
आज सकाळी पाटण येथे मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला. यावेळी राणेंच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन केले. तसेच फोटोला चपलांचा हार घालून मंत्री राणेंचा फोटो जाळण्यात आला.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/230827843126817
नारायण राणे काय म्हणाले होते?
“मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे. मनोज जरांगे-पाटील मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगतात. पण, तसं काही नाही. जरांगे-पाटलांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही. मी मराठा असून, आयुष्यभर कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. ९६ कुळी मराठा आणि कुणबी मराठा वेगळा आहे,” असे नारायण राणेंनी म्हटले होते.
नेमकं काय घडलं?
मराठा समाजातील संभाजीनगर येथील कार्यकर्ते रवींद्र मुठे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन केला होता. फोनद्वारे त्यांचे मंत्री राणेंशी संभाषण झाले. यावेळी मराठा आरक्षण विषयावर बोलत असताना मंत्री राणेंनी मराठा समाज बांधवांविषयी शिवराळ भाषा वापरली. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या कथित ऑडिओ क्लिपची ‘हॅलो महाराष्ट्र’ पुष्टी करत नाही.