नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या भाषणात युवा वर्गाला संबोधित करताना ते म्हणाले की, आजच्या युवकांना अराजकता आवडत नाही. त्यांना घराणेशाही, जातीवाद आवडत नाही. चांगल्या व्यवस्थेला त्यांची पसंती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 2019 या वर्षाला निरोप देण्यासाठी काही क्षणच आता आपल्यासमोर राहिले आहेत. त्यानंतर आपण केवळ नव्या वर्षात प्रवेश करणार नाही, तर नव्या दशकात प्रवेश करणार आहोत. या दशकात देशाच्या विकासाला गती देण्यामध्ये त्या लोकांचा सक्रिय सहभाग असणार आहे ज्यांचा जन्म २१व्या शतकात झाला आहे.
मोदींचा पुन्हा स्वदेशी नारा
मोदी म्हणाले, ‘मी 1 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासीयांना स्थानिक उत्पादने खरेदी करण्याची विनंती केली होती. आज पुन्हा मी सुचवितो की आपण स्थानिक पातळीवर तयार केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊ या. मोदींनी स्थानिक पातळीवर तयार केलेली उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले. 2022 ला स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंतची दोन वर्षे आपण स्थानिक उत्पादने खरेदी करण्याची संकल्प करू या, असेही मोदी म्हणाले.