हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा मग कळेल मराठा समाज काय आहे असे आवाहन अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. तसेच त्यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.
मराठा समाजातील नेत्यांनी माझ्यापुढे पक्षाचे लेबल लावून येऊ नये. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी खुशाल करावे. पण त्यात समाजाचा विचार करावा. मी फक्त मराठा आहे असं समजून तुम्ही मोर्चात सहभागी व्हा. राजकारणाच्या वेळेला राजकारण करा. मराठा आंदोलनाला राजकारणाची जोड देऊ नका. पक्षविरहित आंदोलन झालं पाहिजे असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.
ओबीसी समाजाचे नेते त्यांचं राजकीय आरक्षण किंवा पदोन्नतीतील आरक्षण अडचणीत आल्यावर एकत्र येतात. मग राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतील मराठा नेते गुटखा खावून बसलेत का? असा खोचक सवाल नरेंद्र पाटील यांनी विचारलाय. या मंत्र्यांना लाज वाटत नाही का? असा सवालही नरेंद्र पाटील यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.