नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
नाशिक जिल्हा पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेटिड सोसायटीच्या ११ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकल्या आहेत. त्याचा परतावा घेण्यासाठी पोलिसांना वणवण करावी लागत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सोसायटीच्या संचालक मंडळाने पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून बँकेने सांगितल्याप्रमाणे आणखी काही दिवस परताव्यासाठी वाट पाहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे वरिष्ठांसोबतच चर्चा करूनही संचालक मंडळासह सदस्यांना परताव्यासाठी आणखी काही दिवस वणवण करावी लागणार आहे.
नाशिक जिल्हा पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसयटीची ७० वर्षांनंतर २१ जानेवारी २०१९ रोजी निवडणूक झाली. नवनियुक्त संचालक मंडळाने जिल्हा बँकेत ११ कोटींची मुदत ठेवीचा परतावा घेण्यास प्रयत्न सुरू केले आहेत. बँकेच्या नियमानुसार संचालक मंडळाकडे सर्व कागदपत्रे आहेत. मात्र, बँकेकडे फंड नसल्याने मुदत ठेवतील पैसे मिळत नसल्याचा दावा संचालक मंडळाने केला आहे. संचालक मंडळाने सोसायटीच्या सदस्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सोसायटीच्या मुदत ठेवीतून आर्थिक सहकार्याची अपेक्षा संचालक मंडळाला आहे.
बँकेकडून परतावा मिळत नसल्याने संचालक मंडळाने शनिवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर आयुक्तांनी बँक प्रशासनासोबत चर्चा केली. त्यावेळी बँकेने आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे, २३ मे नंतर फंड येईल. तेव्हा पहिल्यांदा पोलिस सोसायटीचे थकलेले काम मार्गी लावतो, असे आश्वासन पोलिस आयुक्तांना दिले आहे. त्यानुसार, २३ मे नंतर आठ दिवस वाट पाहणार असल्याचे संचालक मंडळाने सांगितले आहे. त्यानंतरही परतावा मिळाला नाही, तर पुन्हा पोलिस आयुक्तांची भेट घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. वेळ आलीच, तर बँकेविरोधात गुन्हा नोंदविण्याचीही तयारी असल्याचे संचालक मंडळाने सांगितले.