नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन ३ मे पर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी रेल्वे सेवा ३ मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या चालू राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. सर्व आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील सर्व मेल, एक्स्प्रेस, मेट्रो, लोकल या सेवा ३ मेपर्यंत बंद ठेवण्याचे येणार असल्याचे पत्रक रेल्वे बोर्डाने काढले आहे. देशातील लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाडी अधिक वेगाने धावणार आहेत. प्रवासी गाड्यांच्या फेऱ्या थांबल्याने मालगाड्यांनी अधिक वेग घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी १४ एप्रिलपासून रेल्वे तिकीट बुकिंग सुरु होणार असल्याची अफवा पसरविण्यात येत होती. मात्र, रेल्वेने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले होते. आता लॉकडाऊन वाढल्याने रेल्वे सेवा बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेल्वेप्रमाणेच सर्व आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. केवळ जीवनाश्यक वस्तूंची जलदगतीनं ने-आण करण्यासाठी कार्गो विमान सेवा सुरु ठेवण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”