नांदेड – मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल 1127 किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणाचं विशाखापट्टणम कनेक्शन समोर आल आहे. गुजरातमध्ये जप्त करण्यात आलेल्या 3 हजार किलोग्रॅम ड्रग्ज प्रकरणात देखील विशाखापट्टणम कनेक्शन आढळले होते.
एनसीबीने केलेल्या तपासात नांदेडमधील हा गांजा आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममधून आणण्यात आल्याचं समोर आल आहे. तसेच नांदेडमधून पुढे हा गांजा जळगाव आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे एनसीबी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे
नांदेडमध्ये नेमकी काय कारवाई झाली ?
मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर मंजराम (तालुका – नायगाव) येथे कारवाई केली. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली. 15 नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी केलेल्या या कारवाईत एनसीबीने 12 चाकी ट्रक ताब्यात घेतला. यातून एकूण 1127 किलोग्रॅम गांजा जप्त केला. तसेच 2 आरोपींना अटक केली. आता आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.