राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका; चालू भाषणादरम्यान आला झटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते आणि विधान परिषदचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना काल दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना,अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आला. यानंतर अमोल मिटकरी यांना  तात्काळ आयकॉन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती चांगली असल्याची माहिती स्वता मिटकरी यांनी दिली आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकड राहिली… माझ्या मनाची होतीया काहिली’ ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात असताना काही क्षणात मिटकरींचा आवाज चिरका व्हायला लागला, तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव तिथं उपस्थित असलेल्या काहींना झाली. त्यानंतर उपस्थितांनी वेळ वाया न घालवता तात्काळ मिटकरी यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं.

माझी प्रकृती आता सुधारते आहे. चिंता करण्यासारखं काही नाही. कोविडचा काळ आहे. त्यामुळं स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येवू नये अशी विनंती अमोल मिटकरी यांनी कार्यकर्ते व मित्रांना केली आहे.

कोण आहेत अमोल मिटकरी

अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असून आपल्या दमदार वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अत्यंत कमी वेळेत आपली छाप पाडली. 2019 मध्ये अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादीला सोडून गेले असताना अमोल मिटकरी यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर भाजपला अंगावर घेतले.

Leave a Comment