सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा आज अखेर निवडणूक आयोगाने केली आहे. या घोषणेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीने पक्ष सोडून गेलेल्या उदयनराजे भोसले यांना चोख प्रतित्तर देण्याचे ठरवले असून यासाठी राष्ट्रवादी नेमका कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर सातारच्या लोकसभा पोटनिवडणुकीचे चित्र ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोरेगाव मतदारसंघाचे आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव सध्या निवडणुकीसाठी सर्वधिक चर्चेत आहे. त्याच प्रमाणे सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि शरद पवारांचे निकटवर्तीय श्रीनिवास पाटील यांचे देखील नाव सातारा पोटनिवडणुकीसाठी चर्चेत आहे, तसेच नितीन लक्ष्मणराव पाटील आणि अविनाश मोहिते यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्याच प्रमाणे त्यांचा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ सोडून सातारा तालुक्यात इतर भागात संपर्क देखील तगडा आहे. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीला उभा करण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचे साताऱ्यात बोलले जाते आहे. तसेच सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे देखील उदयनराजे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार मानले जातात. १९९९ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढले तेव्हा कराड लोकसभा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. हा पराभव धक्कादायक तर होताच त्याच प्रमाणे अनपेक्षित देखील होता. सर्वसामान्य लोकात सहज मिसळून जाणे हा श्रीनिवास पाटील यांच्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा गुण आहे. त्याच प्रमाणे ते भारतीय प्रशासन सेवेत अधिकारी (IAS ) राहिल्यामुळे त्याचा मतदारांवर प्रभाव पडतो.म्हणून राष्ट्रवादी श्रीनिवास पाटील अथवा शशिकांत शिंदे यांच्या पैकी एकाची उमेदवारी जाहीर करू शकते.
दरम्यान शरद पवार जर सातारा लोकसभा पोट निवडणुकीला उभा राहिले तर मी त्यांच्या विरोधात उभा राहणार नाही. फक्त त्यांनी त्यांचा दिल्लीतील बांगला मला राहायला दावा असे मिश्किल विधान उदयनराजे भोसले यांनी केले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी शरद पवार आपल्या वडिलांच्या जागी आहेत आशा आदर देखील व्यक्त केला आहे.