मुंबई । राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख सर्कस म्हणून करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सडेतोड उत्तर दिलं आहे. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र एका विदुषकाची कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समाराच घेतला तोही अगदी आपल्याच शैलीत. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी म्हणून पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात सध्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या कारभारावर निशाणा साधला होता. आपल्या वक्तव्यादरम्यान त्यांनी सर्कशीची उपमा देत एका नव्या वादाला वाचा फोडली. ज्याचे पडसाद आता राज्यातील राजकीय वर्तुळात उठू लागले आहेत.
एकीकडे शरद पवारांनी राजनाथ सिंहांना सणसणीत टोला दिला असतानाच राजनाथ यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चाललेलं सरकार चांगलं काम करत आहे. कोविड १९ च्या बाबतीत आयसीएमआरने मुंबई मॉडेलची प्रशंसा केली आहे, असं मलिक म्हणाले. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असं प्रत्युउत्तर मलिक यांनी दिले आहे.
दुसरीकडे शिवसेनेकडूनही राजनाथ सिंहांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काम अगदी सुसूत्रतेने सुरु असून, उलटपक्षी मध्य प्रदेश, गुजरातमध्येच सर्कस सुरु असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी दिली. सोबतच केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी लडाख मुद्द्यावर जास्त लक्ष द्यावं असा सूरही त्यांनी आळवला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”