मुंबई । अखेर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद खाली केल्यावर आता या पदावर कोण विराजमान होणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
विधानसभा अध्यक्षपद आपल्या पदरी पाडसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षात चढाओढ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.
तत्पूर्वी नाना पटोले यांनी आज बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. काल रात्रीच नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपवले जाणार, हे जवळपास निश्चित आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.