हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं एमआयएमला तीव्र विरोध केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. अखेर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच थेट एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.
शरद पवार म्हणाले, कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही.
राज्याला या निर्णयाबाबत राष्ट्रीय समितीने स्पष्ट करेपर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भुमिका ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत. तो पक्ष निर्णय नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एमआयएमचा प्रस्ताव नाकारला आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम असून त्यांच्या सोबत युतीचा प्रश्नच नाही. तसेच शिवसेनेचे हिंदुत्त्व महाराष्ट्र भर पोचवून एमआयएमचा डाव हाणून पाडा असे आदेश त्यांनी शिवसैनिकाना दिले.