Satara News : पाटणला बाजार समिती निवडणुकीमुळे वातावरण तापलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या बाजार समितीच्या निवडणूक नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेत रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील महत्वाचा विधानसभा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या पाटण तालुक्यातही बाजार समितीची निवडणूक होत असल्याने मंत्री शंभूराज देसाई विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा गट अशा लढत होणार आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने मंगळवार, दि. 28 मार्च रोजी दुपारी 1 वाजता पाटणला बैठक पार पडणार आहे.

पाटण येथे देसाई विरुद्ध पाटणकर असा असलेला संघर्ष सर्वांनाच परिचित आहे. या ठिकाणी अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत पाटणकर गट व देसाई गटात लढत होते. सध्या येथील बाजार समितीच्या निवडणुकीमुळे आता हे दोन्ही गट पुन्हा निवडणुकीसाठी रणनीती ठरवू लागले आहेत. या अनुषंगाने पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मंगळवारी श्रीमंत रणजितसिंह पाटणकर स्मारक, पाटण (भाजी मंडई शेजारी) येथे आयोजित करण्यात आली आहे.

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या महत्वाच्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, आजी/माजी जि.प./ पंचायत समिती सदस्य, सर्व सोसायटीचे चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी व सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.