हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याच आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे असे पत्रात म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतले आहे, ही बाब त्यांनी लक्षात घ्यावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे”अशी असेही ते म्हणाले. तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या आमदारांची कामे झाली तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही, असंही ते म्हणाले.
प्रताप सरनाईक पत्रात नेमकं काय म्हणाले-
भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. काँग्रेस एकला चलो रे ची भूमिका सातत्यानं घेत आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत आहेत. अशा परिस्थितीत आपण भाजपसोबत जुळवून घ्यायला हवं, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.