कृषी कायदा रद्द होणार नाही असं म्हणणारे चंद्रकांत पाटील काय पंतप्रधान आहेत का?? – हसन मुश्रीफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कृषी कायदा बदलणार नाही असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करतानाच, ते मुद्दाम आगीत तेल ओतत आहेत, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आंदोलनाला तीव्रता नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, पण, मुळात महाराष्ट्रात उसाला एफआरपी आहे, कापूस, तूर व इतर उत्पादनांना हमीभाव आहे आणि या संदर्भातील कायदे शरद पवार कृषिमंत्री असताना केलेले आहेत. दरम्यान, कृषी कायदा रद्द करण्यास विरोध करून भाजप हा शेतकरी हिताविरुद्ध आहे हे चंद्रकांत पाटील यांनी सिद्ध केले आहे, असा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मारला आहे.

दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे.

शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट

दरम्यान, कृषी कायद्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment