हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन करून भाजपचा सूफडा साफ केला आहे. महाविकास आघाडीच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात राज्यात भाजपचा जो मोठा पराभव झाला, ते पाहता कदाचित माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे म्हणत असतील काश ईव्हीएम मशीन होता,’ असा टोला हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना हाणला. तसेच भाजपला सत्तेची आणि संपत्तीची मस्ती आली होती या निवडणुकीने जिरली असही ते म्हणाले.
पुणे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे कार्यकर्त्यांनी नियोजन केले. याआधी पक्षीय पातळीवर या निवडणुका झाल्या नाहीत पण, यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मनापासून लक्ष घालून प्रचार केला आणि विजयही मिळवला.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडून आलो नाहीतर मी हिमालयात जाईल अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पदवीधर मधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता मुश्रीफ म्हणाले, या मतदारसंघात भाजपचा विजय व्हावा म्हणून पाटील यांनी जंग जंग पछाडले पण तरीही ही 50 हजार मतांनी त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला. यामुळे आता त्यांनीच हिमालयात जायचे की नाही याचा निर्णय त्यांनीच घ्यावा.असेही हसन मुश्रीफ म्हणाले.