हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीच सरकार असलं तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही असे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त तुळजापूर येथे आले होते त्यावेळी त्यांनी यांवर भाष्य करत म्हंटल की, राष्ट्रवादी स्वबळाची चाचपणी करत नाही पण काँग्रेस स्वबळाचा आग्रह करत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल. परंतु काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही असा चिमटा त्यांनी काढला.
भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र मंदिर उघडल्यानंतर पक्ष प्रवेशाचा मुहूर्त सापडेल. कोरोना असल्याने पक्षप्रवेश रखडले आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले –
आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही असे नाना पटोले यांनी म्हंटल होत.