‘भाजप प्रिय ईडी तू तर सनम बेवफा!’; मिटकरींचा जोरदार टोला..

अकोला । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. आधी शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि आता एकनाथ खडसे यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे. “भाजप प्रिय ईडी, एकदा मेहता, बापट आणि दरेकरांकडे एखादा कप कॉफी घ्यायला जा, नाही तर तुझ्या अशा एकतर्फी प्रेमाला उद्या लोकं ‘सनम बेवफा’ म्हणतील,” असा बोचरा वार अमोल मिटकरी यांनी केला आहे. (ncp leader amol mitkari slams ed)

अमोल मिटकरी यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करून ही बोचरी टीका केली आहे. भाजपा प्रिय ED, नोट बंदी झाल्यानंतर जय अमित शहा यांच्या कंपनीकडे जे 90 करोड रुपये होते, नोटबंदी नंतर 700 करोड रुपये जमा झाले. ही माहिती आजपर्यंत तू का दिली नाहीस गं ? कधीतरी त्यांच्या घरी जाऊन पण समन्स बजावत जा ! मग वाटेल तू भाजपाची गुलाम नाहीस, असा खोचक टोला मिटकरी यांनी एका ट्विमधून लगावला आहे.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये, भाजपा प्रिय ईड, आता तुझ्याबद्दल मात्र शंका यायला लागली आहे. देशात हजारो कोटीचे घोटाळे करणार्‍या भाजपच्या नेते मंडळींना 2014 नंतर आजपर्यंत एकही समन्स बजावला नाहीस. तू भाजपची प्रवक्ता झालीस का गं? तू अशी दुटप्पी का वागते सांगतेस का?, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

शेवटच्या तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची नाव घेऊनच थेट टीका केली आहे. भाजपा प्रिय ईडी, एकदा महाराष्ट्रात पण ये. मेहता, दरेकर, बापट यांच्या घराचा पत्ता तुझ्याकडे नसेल. हवा तर मी देतो. मात्र अशी दुटप्पी वागू नकोस. एखाद कप कॉफी प्यायला इकडे पण जाऊन ये. नाहीतर तुझ्या अशा एकतर्फी प्रेमाला उद्या “सनम बेवफा” म्हणतील लोकं…, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

“खडसेंना नोटीस हे होणारच होतं. भाजपविरोधात जो कोणी मोहिम उघडले, त्यांना केंद्रातून नोटीस पाठवण्यात येईल. प्रताप सरनाईकांनी कंगना रानौत आणि अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात आवाज उठवला, हक्कभंग सादर केला. त्यावेळी ईडीने त्यांना नोटीस पाठवली. यापूर्वी शरद पवारांनाही नोटीस पाठवण्यात आली. खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळत आहेत, त्याचाच परिणाम म्हणजे ईडीची नोटीस आहे”, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. तर, खडसे यांनी आपल्याला अद्याप नोटीस आली नसल्याचं म्हटलं आहे. (ncp leader amol mitkari slams ed)

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’