सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी मेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीत सुरुवात झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले. यावेळी दोन्ही गटात राडा झाला. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना रोखले.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जावळी सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रवादीचेच जावलीतील उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्यात जोरदार लढत होत आहे. दोघांमध्ये काटे कि टक्कर होत असल्यामुळे आज सकाळपासूनच मेढा या मतदान केंद्रावर तणावपूर्ण वातावरण असून, दोन्ही गटांकडून विजयाचा दावा केला जात आहे. दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते मेढा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.
मेढा या ठिकाणी एकाच पक्षातील दोन उमेदवारांमध्ये हाय होल्टेज ड्रामा ठरलेल्या या लढतीमुळे सातारा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्स आदी मिळून 100 हून अधिक पोलिस मतदान केंद्रावर उपस्थित आहेत. दरम्यान आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा आमदार शशिकांत शिंदे व जावलीतील उमेदवार ज्ञानदेव रांजणे या दोघांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, दोन्ही नेत्यांच्या गटात राडा झाल्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.