सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्हा राष्र्टवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, विलासराव शिंदे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज पहाटे आष्टा येथे निधन झाले. गेली अनेक महिने ते आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष होते. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर आष्टा येथे मोठ्या शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थीदशेत असताना १९४५ पासून ते राजकारणात होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या सोबत त्यांनी काम कले आहे. १९६२ साली जिल्हा ते परिषद सदस्यपदी निवडून आले होते. वसंतदादा पाटील यांच्या विचारांचा वारसदार म्हणून जिल्हा त्यांच्याकडे पाहात होता. वसंतदादा निवृत्तीविरोधी कृती समितीचे ते अध्यक्ष होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते.
१९७८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यानी राजाराम बापू पाटील व एन डी पाटील या दोन दिग्गजांचा पराभव करुन राज्याचे लक्ष वेधले होते. काही काळ ते राजकिय विजनवासात होते १९९० नंतर त्यानी राजाराम बापू यांचे चिरंजीव माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी समेट करत राजकीय संघर्ष थांबवला. २००५-०६ ला सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाली होती. चार महिन्यापासून ते श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते. आष्टा कोल्हापुर येथील दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु होते. घरी असताना पहाटे त्याना त्रास होऊ लागला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचे निधन झाले.