विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे, सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घ्या – रोहित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात आरोग्य विभागाकडून परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, या परीक्षेवरुन चांगलाच गोंधळ सुरुच आहे. या गोंधळावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन सुरु असलेल्या गोंधळावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत.

याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा.

गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबर तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात मनस्ताप व्यक्त करण्यात आला. 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. या दोन्ही दिवशी रविवार असल्याने शाळा उपलब्ध होतील,असेही टोपे यांनी सांगितले होते. मात्र, एकाच दिवशी दोन परीक्षा घेतल्या जात असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

Leave a Comment