शरद पवार जेव्हा संसदेत होते तेव्हा हे चड्डीत होते; अमोल मिटकरींची चंद्रकांत पाटलांवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दसरा मेळाव्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “तेरी जुबान कतरना बहुत जरुरी है… ‘तुझे मर्ज है की तू बार-बार बोलता है!’, शरद पवार हे जेव्हा संसदेत होते. त्यावेळी हे महाशय चड्डी आणि टोपीत होते, अशी टीका मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकेरी भाषेत उल्लेख केल्याचा प्रकार काल घडला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांकडून पाटील यांच्यावर चांगलीच टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांच्या शायरीद्वारे प्रत्युत्तर देत टीकाही केली आहे.

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर आता पाटलांवर चांगलीच टीका होऊ लागली आहे.

You might also like