पुणे । विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०५ आमदार निवडून आल्यानंतरही राज्यातील सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता पावलोपावली दिसत असते. त्यातूनच एखाद्या नेत्याचं विधान येतं आणि मग त्यानंतर महाविकास विरूद्ध भाजपा यांच्यात कलगीतुरा बघायला मिळतो. काल मंगळवारी अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यास तयार असल्याचं विधान केलं होतं. या विधानावरून कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी एक ट्विट करत चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला आहे. “आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं BJP तील एक मोठे नेते म्हणाले.सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात BJP पासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी #MVA त घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं!
आतातरी राजकारण थांबवा!— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 29, 2020
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या विधानाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी या विधानातील हवाच काढली. ‘असा कोणताही प्रस्ताव शिवसेनेला आम्ही दिलेला नाही वा शिवसेनेकडून असा काही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याशिवाय राज्यातील सत्तेबाबत सध्या तरी कोणतीही चर्चा पक्षपातळीवर नाही. येत्या काळात स्वबळावर लढायचं, असा निर्णय पक्षाने घेतलेला आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले. फडणवीस यांच्या या स्पष्टीकरणामुळे चंद्रकांत पाटील यांनी नेमकं कोणत्या आधारावर शिवसेनेसोबत जाण्याच्याf प्रस्तावाबाबत विधान केलं होतं, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”