अहमदनगर । राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतही आपला जलवा कायम ठेवला आहे. जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा येथे भाजपाला धोबीपछाड देण्यात राष्ट्रवादीच्या गटाला यश आलंय. भाजपा पुरस्कृत उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपाच्या हातून ही ग्रामपंचायत निसटली असून राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. आमदार रोहित पवार यांनी येथील ग्रामपंचायती निवडणुकीकडे स्वत:हून लक्ष घातले होते. त्याचाचा हा परिणाम असल्याचं दिसून येतंय. या निवडणुकीत विजयसिंह गोलेकर यांच्या खर्डा ग्रामविकास आघाडीने एकहाती वर्चस्व मिळवले आहे.
खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 तर भाजपचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 17 सदस्यांसाठी मतदान पार पडले होते. या 17 पैकी 11 जागा राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायतीने जिंकल्या आहेत. गत ग्रामपंचायतीत येथे भाजपाचे नेते माजी मंत्री राम शिंदेंच्या गटाचे वर्चस्व होते.
मात्र, यंदा रोहित पवारांनी आपला करिश्मा दाखवून खर्डा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवालाय. निकालानंतर राष्ट्रवादी समर्थकांनी गावात जल्लोष केलाय. राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालाचा धुरळा उडाल्याचं दिसून येतंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाने आघाडी घेतल्याचंही प्राथमिक चित्र सध्या दिसत आहे. दुपारपर्यंत राज्यातील सर्वच निकाल हाती येऊन सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’