हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. मनमोहन सिंगांच्या काळात कारवाईही करण्यात आली होती. तुम्हीही कारवाई करा, असं आव्हान नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे.
मनमोहन सिंग यांच्या काळातही फोन टॅपिंग झाल्याचा दावा भाजप करत आहे. पण मनमोहन सिंग यांच्या काळात झालं तेव्हा त्यांनी ज्यांनी हे प्रकार केले त्यांच्यावर कारवाईही केली. आता केंद्र सरकारने या प्रकरणी कारवाई करावी. नुसतं देशाला बदनाम करण्याचा कट आहे असा दावा करू नये, असा टोला मलिक यांनी लगावला आहे. तसेच स्पायवेअर केंद्र सरकारने किंवा त्यांच्या एजन्सीने खरेदी केले की नाही ते सांगावे असा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला.
फडणवीस नेमकं काय म्हणाले-
तत्कालीन मनमोहन सिंग यांच सरकार फोन टॅपिंग करतंय असा आरोप झाला होता. तेव्हा फोन टॅप आम्ही नव्हे तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, असं सांगितल होतं. जे काम झालंय ते लिगली झालंय असही त्यांनी सांगितलं होतं अस फडणवीस म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॅान्ड्रिग रोखण्यासाठी हे फोन टॅप झाल्याच सांगितलं. UPA च्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीर रित्या योग्य आहे हे सांगितलं गेलं, असंही फडणवीस म्हणाले.