राष्ट्रवादीतील फेरबदलानंतर कोणाला कोणती संधी? पवारांच्या खेळीमागे दडलंय काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र देत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापन दिन दिल्लीत साजरा करण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. पवारांनी सुप्रियाताईंना कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर अजित पवारांना साईडलाईन करण्यात येतेय का? अशाही चर्चां सुरु झाल्या आहेत. मात्र फक्त अजित पवारच नव्हे तर छगन भुजबळ, एकनाथ खडसे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यानाही कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. यांच्याऐवजी, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे नंदा शास्त्री या नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आज आपण पाहूया कोणत्या नेत्यावर नेमकी काय जबाबदारी देण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे – कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी, महिला आणि युवा विंगची जबाबदारी, तसेच लोकसभेतील समन्वयाची जबाबदारी

प्रफुल्ल पटेल – कार्यकारी अध्यक्ष, तसेच राजस्थान, गोवा आणि मध्यप्रदेश राज्याची जबाबदारी

सुनील तटकरे – राष्ट्रीय महासचिव, ओडिशा, पश्चिम बंगालची जबाबदारी, शेतकरी आणि अल्पसंख्यांक विभागाचे प्रभारी

जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मीर , कर्नाटक राज्यांची जबाबदारी असेल. तर, एससी एसटी, मजूर विभाग, ओबीसी विभागाची जबाबदारी असेल.

नंदा शास्त्री – दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त

खासदार मोहम्मद फैझल – तामिळनाडू, तेलंगना, केरळ राज्यांची जबाबदारी

अजित पवारांना कोणती नवी जबाबदारी नाही –

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्याकडे कोणतीही नवी जबाबदारी देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र महाराष्ट्रात पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणावरच आपला फोकस ठेवतील असं वाटत आहे. आणि जर राष्ट्रवादीची महाराष्ट्रात सत्ता आल्यास अजित पवार हे मुख्यमंत्री सुद्धा बनू शकतात.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षसंघटनेचे आभार मानले आहेत. माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारीबद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.