सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
भाजपचे तालुका अध्यक्ष मधुकर बिरामने यांनी तालुक्याचे नेते राजेंद्रशेठ राजपुरे यांचे विरोधात खोटे आरोप केले आहेत. या आरोपांमुळे महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांसह, तालुक्यातील गावोगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी बिरामने यांचा निषेध केला असून जर हे आरोप त्यांनी थांबवले नाहीत तर बुधवारी आंदोलन करून तालुका बंद करू, असा इशारा समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला.
आज सायंकाळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व गावोगावचे सरपंच पांचगणी येथील विश्रामगृहात जमा झाले. यावेळी आम्ही सर्वजण आता राजेंद्र शेठ राजपूरे यांचे शब्दाखातर शांत होतो परंतु आता पाणी डोक्यावरून जात असून आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
[better-ads type=’banner’ banner=’197269′ ]
पाचगणी पोलीस ठाण्याचे सपोनी सतीश पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, स्वतः गाड्यांची तोड फोड करून खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला बेबनाव असून राष्ट्रवादीची संस्कृती आम्ही विसरलो नाही. त्यामुळे खोटे आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. अद्यापही जी कामे पूर्ण झाली नाहीत त्यात त्यांना भ्रष्टाचार दिसत असून माहितीचा अधिकार टाकून दबाव आणायचा हा एककलमी कार्यक्रम सध्या त्यांचा चालू आहे. आम्ही स्व. बाळासाहेब भिलारे आणि आमदार मकरंद आबांचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे त्यांनी आम्हाला तालुक्याचा विकास कसा पारदर्शक करायचा हे शिकवू नये आपण आपल्या बुडाखालचा अंधार पहिला पहावा आणि मगच आमच्यावर आरोप करावेत.
नैसर्गिक वणव्याचे भांडवल करून आमचे नाव घेत बदनामी करण्यापेक्षा वणवा कुणी लावला हे त्यांनी शोधावे. त्यांनी केलेले आरोप पूर्णपणे बिन बुडाचे असून त्यात कसलेही तथ्य नाही आता आमचे त्यांना आव्हान आहे की केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे अन्यथा आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असल्याचे शेवटी सांगितले.
यावेळी समन्वय समिती माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, रोहित ढेबे, शशिकांत भिलारे, गणपत भिलारे, रमेश चोरमले, अभय डोईफोडे, गोडवली सरपंच मंगेश पवार, माजी सरपंच अशोक दुधाने, विठ्ठल दुधाने, महेंद्र पांगारे, अंकुश मालुसरे, उमेश जाधव, संतोष आंब्राळे, बंडा राजपुरे तसेच गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते.