हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे महापालिका निवडणुकीत आता आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. चंद्रकांत पाटील पुण्यात आल्यापासून भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आल्यापासून महापालिकेने गैरव्यवहाराचा कळस गाठला आहे. पालिकेतील सभागृहनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष ही पदेही लिलाव करूनच वाटण्यात आली आहेत. पुणे लुटण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्यामुळे महापालिकेतील निविदा आणि पाटील यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील कोथरुडच्या मतदार संघातून निवडून आल्यानंतर त्यांनी महापालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला आहे, असं जगताप यांनी म्हटलं आहे. काळ्या यादीत असलेल्या भाजप आमदार प्रसाद लाडांच्या कंपनीला 41 कोटींची निविदा देण्यात आली असल्याचं प्रशांत जगतापांनी सांगितलं आहे. तसेच भाजपकडून पुणेकरांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देखील प्रशांत जगताप यांनी केला आहे.