हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शाईफेक करण्यात आली. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा हल्ला झाला ही घटना निंदनीय आहे. मी कोणत्याही प्रकारचे समर्थन करत नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. मी गिरीश कुबेर यांचे पुस्तक वाचले आहे. काही मुद्द्यांवर वाद आहे, असे पवार यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी संमेलनास पाहणी करण्यासाठी आलेल्या जेष्ठ लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा प्रकार घडला. याबाबत पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली.
यावेळी पवार म्हणाले की, गिरीश कुबेर यांनी जे पुस्तक लिहले आहे. ते मी वाचले आहे. त्यात काही मुद्यांवर वाद आहे. मी त्या खोलात गेलेलो नाही. त्यांनी किंवा एखाद्या लेखकाची भूमिका मान्य नसेल तर वैचारिक चर्चा होऊ शकते. मात्र, तसे न करता अशा प्रकारचे कृत्य करणे अथवा कोणत्याही संघटनेने असा हल्ला करणे हे शोभत नाही. तशी महाराष्ट्राची ही संस्कृतीही नाही, असे पवार यांनी म्हंटले आहे.