सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे. तसेच पेट्रोल व डिझेलचीही दरवाढ केलेली आहे. केंद्र सरकारच्या या दरवाढीला विरोध दर्शवण्यासाठी सातारा येथे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुचाकी ढकलत धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोदी सरकार मुर्दाबाद ,या मोदी सरकारच करायच काय, खाली मुंडी वर पाय, नरेंद्र मोदी हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल माने, तेजस शिंदे, राजकुमार पाटील, सुमित्रा जाधव, अतुल शिंदे, संगिता साळुंखे, शुभम साळुंखे, रफिक शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/329450311856647
निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोल- डिझेलची दरवाढ झाली असताना आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारने खताच्या किंमतीत वाढ करून धक्का दिला आहे. कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेले आहे. तेव्हा केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी कराव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा राष्ट्रवादी काॅंग्रेस निषेध आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष सुनिल माने म्हणाले, गेल्या काही दिवसापासून राज्यातच नव्हे, तर देशात सुद्धा पेट्रोलच्या किमती भरमसाट वाढू लागल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून खतांचे दर वाढले आहेत. तर पेट्रोल आज शंभर रुपयांवर गेले आहे. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने आजचे आंदोलन केले आहे. खत दरवाढ आणि पेट्रोल दरवाढ कमी झाली नाही. तर शेतकऱ्यांच्या जनावरांसह आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत.