हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत ईडी कडे तक्रार करत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्याना एखादे ईडीचे प्रवक्तेपद द्यावे असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
रोहित पवार म्हणाले, किरीट सोमय्यांना भाजपने एक ऑफिशियल पोस्ट द्यावी. ईडीचे प्रवक्ते अशी काही तरी पोस्ट त्यांना द्यावी. आता त्यांच्याकडे एक प्रतिनिधी एवढंच पद आहे. त्यांना प्रवक्ते केले तर ते ईडीचे प्रतिनिधी आहेत हे ऑफिशियल होऊन जाईल. ईडींना कळायच्या आधी त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्यामुळे त्यांना हे पद द्यायला हरकत नाही, असा टोला पवार यांनी लगावला.
ईडी किंवा सीबीआयचा राजकीय वापर होत असेल तर घातक आहे. एखाद्या राजकीय नेत्याला दाबायचं असेल तर अशाच यंत्रणाचा वापर केला पाहिजे असं संबंधितांना वाटतं. लोक घाबरतात. कारण त्यात तथ्य नसलं तरी त्या प्रक्रियने त्रास होतो. कुटुंबावर परिणाम होतो. त्यातून काहीच बाहेर येत नाही.