महिलांची माफी मागा, अन्यथा गाल आणि थोबाड रंगवू शकतो; रुपाली चाकणकरांचा दरेकरांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असं म्हणत भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी जशास तसे उत्तर दिले.

प्रवीण दरेकर आपण वरिष्ठांच्या सभागृहातील विरोधीपक्ष नेते आहात. हे वरिष्ठ आणि ज्येष्ठांचं सभागृह आहे. पण, तुमच्या वैचारिकत्ता आणि अभ्यासाशी दूर दूर काही संबंध नाही आपल्या बोलण्यातून ती घाण टपकत आहे. ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले.

त्या पुढे म्हणाल्या, आज तुमच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवले, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला.