हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येतायत, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी शरद पवार बोलत होते.
अलीकडे महाराष्ट्रावर काही ना काही सातत्याने संकटं येत आहेत. एक मोठं अतिवृष्टीचं संकट राज्यावर आलं… हजारो घरं पडली… अनेक घरांमध्ये पाणी शिरलं… होतं नव्हतं ते वाहून गेलं… पण एक गोष्ट चांगली आहे, या संकटावरही मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली.
”एका बाजूने या पूरग्रस्त भागातील घरांची बांधणी करणं हे आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूने समस्त कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आज मोठं पाऊल पडत आहे. या चाळीच्या ठिकाणी मोठ-मोठ्या इमारती उभ्या राहणार आहेत. पण मला तुम्हाला सांगायचंय की यातला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका… तुम्ही चाळीत आतापर्यंत जसे एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात, एकमेकांच्या जीवनाचा भाग होतात, त्याचप्रमाणे इथून पुढेही बिल्डिंगमध्ये असेच एकत्र राहा असे आवाहन पवारांनी केलं.