हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपूतप्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विचारला आहे. शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सुशांतप्रकरणी सीबीआयवर निशाणा साधला आहे. सुशांतच्या केसमध्ये त्याची आत्महत्या राहिली बाजूला आणि हे सगळे अन्य ठिकाणी वळत आहे, असे पवार म्हणाले
‘सुशांतच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत होते. पण मुंबई पोलीस हे काम करतील, यावर केंद्र सरकारला विश्वास नसावा. त्यामुळे त्यांनी वेगळी एजन्सी नेमली. मात्र या एजन्सीने काय दिवे लावले, ते आम्हाला दिसले नाहीत. त्याचा प्रकाश काही बघायला मिळाला नाही. आता ते सगळं भलतीकडेच चाललं आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी सीबीआय तपासावर टीका केली आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी राहिली बाजूला आणि दुसऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या संस्था दुसरीकडे लक्ष वळवत आहे की काय? अशी शंका निर्माण होत आहे’, असंही पवार म्हणाले.जवळपास तीन महिने होत आले तरी या प्रकरणात सीबीआयला अजून काहीच सापडले नाही. या उलट हा तपास आत वेगळ्याच दिशेत जात असल्याचे, शरद पवार यावेळी म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’