हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने विस्फोट केला असून दररोज 50 हजार रुग्णसंख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील कोरोनाची आकडेवारी वाचून दाखवत परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. कोरोनाचे हे संकट परतावून लावण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत आहे. मात्र, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. असे शरद पवार यांनी म्हंटल.
कामगार, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कित्येकांना आर्थिक झळ बसत आहे. या परिस्थितीला धैर्याने आपण सामोरे गेलेच पाहिजे, याला पर्याय नाही. समाजातील प्रत्येक घटकाला माझी विनंती आहे, आपण वास्तव स्विकारायला हवे. जनतेच्या जिविताच्या दृष्टीने राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहे. त्यासाठी, सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही पवार यांनी म्हटलं.
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. केंद्र सरकारही आपल्याला सहकार्य करत आहे. मी कालच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. राज्यातील आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर आम्ही चर्चा केली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य खाते महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे आश्वासन दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राचे सामूहिक प्रयत्न आणि केंद्राची मदत या दोहोंच्या साहाय्याने आपण या संकटातून बाहेर पडू, असे शरद पवार यांनी सांगितले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page