हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात संप सुरू आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या या आंदोलनाबाबत अजूनही काही तोडगा निघाला नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल 4 तासांहून अधिक वेळ चाललेली बैठक संपली आहे. त्यामुळे एसटी संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
वरळी येथील नेहरू सेंटर येथे तब्बल 4 तास ही मॅरेथॉन बैठक सुरू होती. अत्यंत गुप्त अशा या बैठकीत एस टी कामगारांच्या मागण्या, आणि संप यावर खलबते झाली. खुद्द शरद पवारांनी यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याने एस टी कामगारांचा प्रश्न सुटणार असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावरच एस टी कामगारांनी संप पुकारल्याने सरकार काही काळ बॅकफूटवर गेले होते. त्यातच भाजप नेत्यांनी देखील एस टी कामगारांच्या संपात सहभागी होत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी सातत्याने कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली होती, मात्र दिवसेंदिवस हा संप चिघळत गेला.